मुंबई : मुंबईत पेंग्विन आणल्यामुळे अजूनही आमच्यावर टीका केली जाते. पण यावर मला एकच प्रश्न विचारायचा आहे, आम्ही पेंग्विन दाखवतो, तुम्ही भारतात आणलेले चित्ते दाखवा, असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि सरकारला लगावला आहे. गेल्या अडीच वर्षांत राज्यात मुख्यमंत्री नव्हते, तर घटनाबाह्य व्यक्ती बसली होती. त्यांच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईची अवस्था वाईट झाल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मुंबईचा आदित्योदय 2025’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये आदित्य ठाकरेंनी मुलाखत देत मुंबई महापालिका निवडणुकीचं व्हिजन मांडलं. यावेळी कोस्टल रोडच्या अपूर्ण कामावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच भारतात आणलेल्या चित्त्यांवरूनही सरकारला टोला लगावला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या कामाचं सार “आदित्योदय” या कॅलेंडरमध्ये आलं आहे. महाराष्ट्रात साडे 11 हजार हेक्टर जमीन कांदळवनात समाविष्ट केली.
EV पॉलिसी 2021
2021 मध्ये EV पॉलिसी आणली. त्यावेळी जागतिक घडामोडींचा विचार करून महाराष्ट्रासाठी 2025 पर्यंत 10% इलेक्ट्रिक व्हेइकल्स असाव्यात, असं ठरवलं. 2023 पर्यंत 9.1% गाड्या इलेक्ट्रिक झाल्या आहेत.
कोस्टल रोड प्रोजेक्ट
2017 मध्ये कोस्टल रोडचं भूमिपूजन झालं. महिन्याला आम्ही त्याचा आढावा घेत होतो. 2023 पर्यंत पूर्णत्वास नेणं अपेक्षित होतं. मात्र, सरकार बदलल्यावर प्रकल्पाला अडथळे आले.
भाषाविषयक मत
मराठी येणं गरजेचं आहे, पण त्यासोबत इतर तीन ते चार भाषा शिकल्यास भविष्यात त्याचा उपयोग होईल.
बेस्ट बस सेवा
बेस्ट बसमुळे 30-34 लाख लोक दररोज प्रवास करतात. BMC ने बेस्टला निधी दिला पाहिजे, कारण सध्या MMRDA ला साडे 5 हजार कोटी दिले जातात, मात्र बेस्टला काहीही दिलं जात नाही.
बॅनरबाजीबाबत मत
मुंबईतील बॅनरबाजी थांबली पाहिजे. निवडणुकीनंतर होर्डिंग्सची गरज नाही. काम सोशल मीडियावर मांडावं.
बाळासाहेब ठाकरे स्मारक
स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. हे स्मारक प्रेरणा आणि शक्तीस्थान असेल.
आव्हाने आणि पुढची दिशा
बीडीडी चाळीतील 5,500 कुटुंबांना 500 स्क्वेअर फुटांची घरं दिली जातील. मुंबईतील घरांचा प्रश्न आव्हानात्मक आहे. अदानींनी मुंबईवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे, असंही त्यांनी सूचित केलं.
राजकीय भूमिका
राज्यासाठी चांगलं होत असेल, तर आम्ही कुणालाही भेटायला तयार आहोत. विरोध तिथेच करू, जिथे गरज आहे. गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री नव्हते, तर घटनाबाह्य व्यक्ती सत्तेत होती